
-पंतप्रधानांनी जनतेचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली, 13 डिसेंबर (हिं.स.)। केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत केरळमध्ये नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपाने थेट राज्याची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत दणदणीत विजय मिळवत तब्बल ४५ वर्षांपासून सुरू असलेली डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील एकूण १०१ जागांपैकी १०० जागांसाठी मतदान झाले होते. या १०० जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५० जागांवर विजय मिळवला आहे. डाव्या पक्षांची आघाडी असलेल्या एलडीएफला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ १९ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. उर्वरित २ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. या निकालामुळे तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीएची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर अनेक दशकांपासून डाव्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. तसेच तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर सातत्याने निवडून येत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपाने या भागात आपला जनाधार वाढवत डावे पक्ष आणि काँग्रेसचे राजकीय वर्चस्व मोडून काढले असून, या विजयाला केरळच्या राजकारणातील एक महत्त्वाचे वळण मानले जात आहे.
या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरमच्या जनतेचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘एक्स’वरून प्रतिक्रिया देताना त्यांनी “धन्यवाद तिरुवनंतपुरम!” असे म्हणत या जनादेशाला केरळच्या राजकारणातील ऐतिहासिक बदल असे संबोधले. राज्याच्या विकासाच्या आकांक्षा केवळ भाजपाद्वारेच पूर्ण होऊ शकतात, याची जाणीव जनतेला झाली असल्याचे नमूद करत, तिरुवनंतपुरम शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एनडीए कटिबद्ध राहील, असे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे.
पंतप्रधानांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे कौतुकही केले. ते म्हणाले, लोकांमध्ये काम करणाऱ्या आणि हा उत्कृष्ट निकाल मिळवून देणाऱ्या सर्व मेहनती भाजप कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. आजचा दिवस केरळमध्ये तळागाळात पिढ्यानपिढ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा आहे, ज्यामुळे हा ऐतिहासिक निकाल शक्य झाला आहे. आमचे कार्यकर्ते आमची ताकद आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीए उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की केरळमधील लोक यूडीएफ आणि एलडीएफला कंटाळले आहेत आणि त्यांना एनडीए हाच एक 'विकसित केरळ' बांधण्याचा एकमेव पर्याय वाटतो ज्यामध्ये सुशासन आणि सर्वांसाठी संधी उपलब्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule