डी.एच.ओ. मानांकनात चंद्रपूरची भरारी, राज्यात तिसरा, विभागात प्रथम क्रमांक
चंद्रपूर, 13 डिसेंबर (हिं.स.)। राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामग
डी.एच.ओ. मानांकनात चंद्रपूरची भरारी, राज्यात तिसरा, विभागात प्रथम क्रमांक


चंद्रपूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।

राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर विभागाच्या परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत चंद्रपूरने आरोग्य सेवेतील गुणवत्तेची छाप पाडली आहे.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या माता–बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, लसीकरण, आरसीएच ऑनलाईन नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत मोफत तपासण्या आदी नियमित व राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले.

मानांकनातील गुणांनुसार धाराशिव जिल्हा ६३.३० गुणांसह पहिल्या, अकोला ६२.२७ गुणांसह दुसऱ्या, चंद्रपूर ५९.१५ गुणांसह तिसऱ्या, गोंदिया ५६.९१ गुणांसह चौथ्या तर बुलढाणा ५६.२५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विविध आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीत मिळालेले हे स्थान आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचे फलित असल्याचे डॉ. कटारे यांनी नमूद केले.

सांघिक कामगिरीला यश

हे मानांकन जिल्ह्यातील सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी, तसेच गावपातळीवर कार्यरत आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक–सेविका, आशा सेविका व आशा गटप्रवर्तक यांनी गुणवत्तापूर्ण सेवा दिली.

यासोबतच डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका व जिल्हास्तरीय कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रम समन्वयक व पर्यवेक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम प्राथमिक उपचारांसह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून पुढेही कायम राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande