
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)
आपले नाशिक - हरित नाशिक या संकल्पनेवर आधारित हरित नाशिक मोहिमेचा सोमवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्वे नंबर 69 या नाशिक महानगरपालिकेच्या हरित पट्ट्यातील सुमारे अडीच एकर जागेवर तसेच गोदावरीच्या किनारी सुयोजित प्रकल्पालगत एकत्रितपणे सुमारे 1000 विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे ,अशी माहिती महापालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आंध्र प्रदेशातील गोदावरीच्या अंतिम भागात असलेल्या राजामुद्री येथील नर्सरी मधून देशी प्रजातीची दहा ते पंधरा फूट उंचीपर्यंतची झाडे शहरात उपलब्ध झालेली आहेत. टप्प्याटप्प्यातून एकूण 15000 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून सी एस आर व लोक सहभागातून सदर वृक्ष उपलब्ध झालेली आहेत. सदर वृक्षांच्या लागवडी व संवर्धनाकरिता देखील विविध सामाजिक संघटना, अध्यात्मिक संस्था व एनजीओ यांचा सहभाग घेण्यात येत आहे. हरित मोहिमे अंतर्गत अधिक संख्येने लोकसहभागातून वृक्षारोपण व्हावे याकरिता डिजिटल ॲपच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. याकरिता हरित नाशिक नावाच्या मोबाईल ॲपचे देखील उद्घाटन सोमवारी करण्यात येणार आहे. या ॲपद्वारे नाशिककरांना त्यांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी नाव नोंदणी करता येईल. 25 पेक्षा अधिक वृक्ष लागवड एखाद्या संस्था किंवा व्यक्तीमार्फत त्यांच्या उपलब्ध जागेनुसार मागणी करण्यात आल्यास त्यांना प्रशासनामार्फत झाडे उपलब्ध करून दिले जातील. हरित नाशिक मोहिमेच्या कार्यक्रमात वृक्षारोपणासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन विविध संघटना व संस्थांमार्फत करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV