
जळगाव 13 डिसेंबर (हिं.स.)केळी उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा नवीन संकट ओढवलं आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत असून या थंडीचा केळी पिकाला देखील फटका बसत आहे. यामुळे केळी उत्पादकांपुढे नवे आव्हान निर्माण केले आहे. दुसरीकडे थंडीचा रब्बीतील पिकांना फायदा होत आहे.गेल्या दोन-तीन महिन्यांत केळीचे भाव अतिशय खालच्या स्तरावर गेले होते आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. मागील पंधरवड्यात भावात सुधारणा दिसू लागली होती; परंतु आता थंडीमुळे बाजारात दर्जेदार मालाचे प्रमाण कमी येऊ शकते, घडाचे वजन घटण्याची शक्यता आहे, फळाचा दर्जा (लांबी-जाडी) घसरण्याचा धोका असल्याने व्यापारी आणि कृषी तज्ज्ञांनी यामुळे परतावा कमी होण्याचा इशारा दिला आहे.थंडीमुळे केळी पिकाच्या वाढीवर परिणाम होतो, विशेषतः १०°C पेक्षा कमी तापमानात नैसर्गिक वाढ थांबते, ज्यामुळे उत्पादन घटते आणि दरांवर परिणाम होतो; याशिवाय थंडीची झळ बसल्याने पानांची वाढ थांबते, पानांचे टोक सुकते आणि पानांवर काळपटपणा दिसू लागतो. तसेच थंडीत करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, जो केळीला मोठा फटका देतो. तर थंडीमध्ये जास्त पाणी दिल्यास मुळांना इजा होते. कमी पाणी दिल्यास झाड कोमेजते या दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर