पालघरच्या किर्डपाडा–जलसार जि. प. शाळांत शिक्षकांची तीव्र कमतरता; पालक-ग्रामस्थ संतप्त
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता ही गंभीर समस्या बनली असून, त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे. अनेक वर्ग एकाच शिक्षकाला सांभाळावे लागत असल्याने अध्यापनाची गुणवत्ता घटत असून, विद्यार्थ्यांचे शैक
किर्डपाडा–जलसार जि. प. शाळांत शिक्षकांची तीव्र कमतरता; पालक-ग्रामस्थ संतप्त


पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता ही गंभीर समस्या बनली असून, त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे. अनेक वर्ग एकाच शिक्षकाला सांभाळावे लागत असल्याने अध्यापनाची गुणवत्ता घटत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची स्थिती जलसार ग्रामपंचायत हद्दीतील जलसार व किर्डपाडा (किरईपाडा) जिल्हा परिषद शाळांमध्ये निर्माण झाली आहे.

जलसार व किर्डपाडा गावात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. यापैकी किर्डपाडा गावातील दोन वर्गखोल्या असलेल्या शाळेत कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध नसून, सध्या खाडा बदली शिक्षकाच्या भरवशावर पटसंख्या केवळ दोन असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. दुसरीकडे जलसार जिल्हा परिषद शाळेत ३६ विद्यार्थ्यांची पटसंख्या, चार वर्गखोल्या असून प्रत्यक्षात केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे मार्गदर्शन मिळत नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजली भोईर (जलसार), पालकवर्ग, जलसार ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विकोश म्हात्रे तसेच ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पालघरच्या शिक्षण विभागाची प्रत्यक्ष भेट घेत, दोन्ही शाळांमध्ये तातडीने शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. मात्र, याबाबत शिक्षण विभागाकडून अद्यापही ठोस कार्यवाही न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी या भागातून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande