
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)
: मुंबईतील पुनर्विकास सुरु असलेल्या उंच इमारत बांधकामांसाठी सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. अशा सुरक्षा मानकांचा अवलंब केला जातो का नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अनंत नर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य मुरजी पटेल यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार उंच इमारतींच्या बांधकामांच्या सुरक्षा उपायांबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. जोगेश्वरी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीअंती जर विकासक दोषी आढळला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल.
इमारतींचा पुनर्विकास म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जोगेश्वरी अपघात प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी