'जय जय महाराष्ट्र माझा' वर चर्चा झाली तर उद्धव ठाकरेंचा बुरखा फाटेल - नवनाथ बन
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। ‘वंदे मातरम’ गीतावर संसदेत जशी चर्चा झाली तशी चर्चा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतावर विधिमंडळात झाली पाहिजे. अशी चर्चा झाली तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या 107 जणांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या काँग्रेसच्या मांडी
Navnath ban


मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। ‘वंदे मातरम’ गीतावर संसदेत जशी चर्चा झाली तशी चर्चा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतावर विधिमंडळात झाली पाहिजे. अशी चर्चा झाली तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या 107 जणांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंचा बुरखा फाटेल, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मोडून काढण्यासाठी त्यावेळच्या काँग्रेसच्या केंद्रातील आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारने काय काय केले याचा इतिहासही या निमित्ताने महाराष्ट्रापुढे येईल असेही श्री. बन यांनी नमूद केले.

श्री. बन म्हणाले की, महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही. महायुतीचे तीन प्रमुख घटकपक्ष एकत्र बसून चर्चा करून येत्या 5 ते 6 दिवसांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र ठरवतील. आगामी निवडणुका महायुती एकत्रितपणे लढून जास्तीत जास्त जागा जिंकणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते पद द्यायचा अधिकार सत्ताधा-यांना नसतो तो अधिकार मतदारांना असतो आणि मतदारांनी उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. उबाठा गटाला राज्यातील जनतेने सपशेल नाकारले आहे. विधानसभेला 90 जागा लढवून केवळ 20 जागी त्यांना विजय मिळाला. त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळही गाठता आले नाही त्यामुळे उबाठा गट त्या पदावर दावा करू शकत नाही असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.

पुन्हा खासदारकीसाठी राऊत राहुल गांधी यांची गुलामी करत आहेत

संजय राऊत यांची खासदारकीची टर्म संपत आली आहे. उबाठा सेनेच्या कोट्यातून पुन्हा खासदारकी मिळणे अशक्य हे राऊतांना कळून चुकल्याने पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी ते राहुल गांधी यांची गुलामी करत आहेत. श्री. राऊत हे काँग्रेसच्या वळचणीला जाऊन राहुल यांचे खोटे ब्रॅण्डिंग करत असल्याची टीका श्री. बन यांनी केली.

जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावरील राष्ट्रदोहाच्या आरोपांमध्ये त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत भाजपा मलिकांसोबत ना चर्चा करेल ना त्यांच्यासोबत काम करेल. जिथे जिथे श्री. मलिक नेतृत्व करणार असतील तिथे भाजपा मलिक यांच्यासोबत युती करणार नाही. प्रसंगी त्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घ्यावी लागली तरी भाजपा तसे करेल असेही श्री. बन यांनी स्पष्टपणे सांगितले .

प्रथा परंपरा यांच्यावर शहाजोगपणाचे सल्ले राऊतांनी देऊ नयेत असा सणसणीत प्रहार श्री. बन यांनी केला. श्री. बन यांनी सांगितले की, उबाठा सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. नारायण राणे यांचे घर पाडले. विरोधकांना त्रास देत हल्ले करण्याची, घरामध्ये सीसीटीव्ही लावून रेकॉर्डींग करणे या प्रथा सुरू केल्या.

राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्राचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की राज यांनी सूचना जरूर कराव्यात मात्र त्यावर राजकारण करू नये.

राऊतांना खुले आव्हान

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे शिवसेनेत होते या राऊतांनी केलेल्या दाव्यावर प्रखर हल्ला चढवत श्री. बन यांनी राऊतांना या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एकतरी पुरावा द्या असे आव्हान दिले. रविंद्र चव्हाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले व्यक्तिमत्व आहे, संजय राऊत अफवा पसरवण्याचे नीच राजकारण करत असल्याचेही ते म्हणाले. श्री. चव्हाण यांनी स्वकर्तृत्वावर नगरसेवकपदापासून ते मंत्री आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदा पर्यंत मजल मारली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande