रायगड : कार–कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू
रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५
पुई स्टॉपजवळ काळाचा धक्का; कार–कंटेनर अपघातात दोन ठार


रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक एम.एच. ११ डी.डी. ०४२५ हा मुंबईकडून कोलाडच्या दिशेने महामार्गावरून जात होता. पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ असताना, त्याच दिशेने येणारी कार क्रमांक एम.एच. ४६ सी.यू. ८४५३ हिने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. कार चालक हुसबान अब्दुल हमीद कारविनकर (वय २०, रा. आंबेत, ता. म्हसळा, जि. रायगड) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या भीषण धडकेत ओवेस सज्जाद सरखोत (रा. वणी, पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) आणि सज्जाद अब्दुल सखुर सरखोत (रा. वणी, पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक हुसबान अब्दुल हमीद कारविनकर आणि सरजित सज्जाद सरखोत (रा. वणी, पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस तसेच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस अधिकारी महाडिक हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande