
परभणी, 13 डिसेंबर (हिं.स.)।
बुलेट दुचाकीवरून फटाके वाजवत शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा प्रकारे फटाके वाजवत जाण्यामुळे पादचाऱ्यांना तसेच रात्रीच्या वेळी रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, यामुळे अपघाताचा धोका देखील वाढत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या तसेच बेकायदेशीर व फटाके आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणारे वाहनचालक आढळून आल्यास त्यांचा सायलेन्सर जप्त करण्यात येत असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis