
परभणी, 14 डिसेंबर (हिं.स.)। परभणी तहसील कार्यालयावर परभणी शहरासह ग्रामीण भागातील १०० हून अधिक गावांचा प्रशासकीय कार्यभार असल्याने प्रशासन व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता परभणी शहर व परभणी ग्रामीण असे दोन स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली होती. त्यानुसार संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे प्राप्त झाला असून शासन स्तरावर त्याचे अवलोकन करून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
आमदार राजेश विटेकर यांनी या संदर्भात विधानसभेत अ-तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. परभणी शहर व ग्रामीण परिसरातील गावांची संख्या, लोकसंख्या तसेच इतर प्रशासकीय निकष पूर्ण होत असल्याने स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन २०२५ मध्ये माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे काय, तसेच या संदर्भात अपर मुख्य सचिव (महसूल) यांना आदेश देण्यात आले आहेत काय आणि नवीन अपर परभणी शहर तहसील कार्यालय किती कालावधीत स्थापन होणार, अशी माहिती त्यांनी विचारली होती.
यावर उत्तर देताना महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आवश्यकतेनुसार नवीन कार्यालये निर्मितीबाबत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने प्राप्त प्रस्तावांचे सध्या अवलोकन सुरू असून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार राजेश विटेकर यांच्याकडून सन २०२५ मध्ये निवेदन प्राप्त झाले आहे, ही बाब खरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis