
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जांभा बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन अद्याप पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी थेट धरणाच्या पात्रात उतरून अर्धनग्न जलसमाधी आंदोलन छेडले. शासनाने यापूर्वी दिलेले पुनर्वसनाचे आश्वासन प्रत्यक्षात न उतरल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या आंदोलनाची तातडीने दखल घेत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जांभा बु. येथील पुनर्वसनाचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. आमदार पिंपळे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शासनाने जांभा बु. येथील पुनर्वसनाच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतल्याचे मान्य केले.
यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी तातडीने जांभा बु. येथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून, १०० टक्के पुनर्वसनाचा प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडल्याची माहिती दिली. शासनाने या मागणीचा सकारात्मक व गांभीर्याने विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
तथापि, प्रत्यक्षात पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे