
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार अकोला जिल्हयातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तकार आयोग, अकोला येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणापैकी १२ हजार ५२९ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकुण १ हजार ७३६ प्रलंबित प्रकरणात व एकुण ६ हजार ९०७ दाखलपुर्व प्रकरणात समेट घडुन आला. ८ हजार ६४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहीक वाद स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. अॅक्ट आणि ग्रामपंचायतचे घरपट्टी/पाणीपट्टी तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होउन रक्कम २६ कोटी ५६ लाख ८६ हजार ४६८ रुपयांची तडजोड झाली. आपसी सहमतीने घटस्फोट घेणारे पती-पत्नी बे एकुण १२ जोडपे नांदण्याकरिता गेले. महत्वाची बाब म्हणजे एका प्रकरणामध्ये पती पत्नी मध्ये असलेल्या वादाबाबत मागील ५० वर्षांपासून प्रकरणे प्रलंबित होती प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघाली.
लोक न्यायालय यशस्वी होणेकरीता एस. बी. कचरे अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच जिल्हयात कार्यरत सर्व न्यायाधिश, न्यायालयीन कर्मचारी, वकील वृंद यांचे योगदान लाभले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे यु. आर. वाडेगावकर, अधिक्षक, पी.एम. बलिंगे, सहा, अधिक्षक संजय व्ही. रामटेके, व.लि.पी. एल. भगेवार, कार्यालयीन सहायक वैभव ग.ताथोड, क.लि.व हरिष इंगळे, शिपाई, शाहबाज खान, शिपाई व इतर विधी सेवा प्राधिकरणाचे लिपीक आणि शिपाई लोकअभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ आणि न्यायीक कर्मचारी, विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
लोक अदालत यशस्वी पार पाडणेकरिता अकोला बार असोसिएशनपोलिस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,अकोला विधी महाविदयालय व नथमल गोयनका विधी महाविदयालय, यांचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे