
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्यातील सर्व अधिकारी वर्गाने कोणतेही काम करताना संविधान, कायदे व नियमांच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावेत, तसेच कोणत्याही प्रकारचे चुकीचे अथवा नियमबाह्य काम टाळावे, असे विनम्र आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे.
अलीकडे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील सुमारे ४० एकर जमिनीच्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी निर्णय घेताना अधिक काळजी घेणे आवश्यक होते, असे विधान केले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत जावेद जकरिया यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना संयमाने व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले आहे.
खुल्या पत्रात जकरिया म्हणतात की, कोणतेही प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशी सुरू होते आणि त्या वेळी अनेकदा राजकीय व्यक्ती स्वतःला त्या प्रक्रियेतून बाजूला काढून घेतात, तर प्रत्यक्ष चौकशी, कारवाई आणि जबाबदारीचा भार सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गावरच येतो, असा अनुभव वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येऊन किंवा घाईघाईने निर्णय न घेता, प्रत्येक बाब कायदेशीर चौकटीत तपासूनच निर्णय घ्यावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
“अधिकारी हे प्रशासनाचा कणा आहेत. त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता, नियम, कायदे आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारेच काम करावे,” असे जावेद जकरिया यांनी पत्रात नमूद केले आहे. फाईलवर सही करताना दूरगामी परिणामांचा विचार करावा, कारण भविष्यात एखाद्या प्रकरणाची चौकशी झाली तर त्याचा थेट परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच होतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हे पत्र कोणालाही दोष देण्यासाठी नसून, अधिकारी वर्गाची कायदेशीर व प्रशासकीय सुरक्षितता जपावी आणि प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार राहावे, या उद्देशाने लिहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील अधिकारी वर्गाने हे आवाहन सकारात्मक भावनेने घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
जावेद जकरिया यांच्या या खुल्या पत्राची प्रशासकीय वर्तुळात चर्चा होत असून, अनेकांनी त्यांच्या संयमित व वास्तववादी भूमिकेचे स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे