
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या वतीने अकोला येथे पार पडणाऱ्या १२ व्या विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची माळ प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विजया मारोतकर यांच्या गळ्यात पडली आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणात व्हावा या उद्देशाने गेल्या अकरा वर्षांपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती अकोलाच्या वतीने राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन पार पडत आहे. यावर्षी दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणाऱ्या विचार साहित्य संमेलनाला एक तप पूर्ण होत आहे. संमेलनाच्या मार्गदर्शन व आयोजन समितीने १२ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. विजयाताई मारोतकर यांची निवड एकमताने केली आहे,
प्रा. विजयाताई मारोतकर मुळच्या नागपूर येथील असून त्यांना बालवयातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामूहिक प्रार्थना व भजनाचे बाळकडू मिळाले आहे, त्यांच्या आई, वडिलांचा आदर्श विवाह सुद्धा वंदनीय महाराज यांनीच लावून दिला होता, त्यामुळे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विचारांचा वारसा प्रा विजयाताई यांना आहे. साहित्य क्षेत्रातील एकूण 21 पुरस्कार प्राप्त,तसेच विविध साहित्य संमेलन अध्यक्ष, उदघाटक, निमंत्रक पद त्यांनी भूषविले आहेत.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक साहित्य संमेलन व तसेच पोरी जरा जपून ', या काव्यमय कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर सादरीकरण करत आहेत. त्यांची एकूण ४५ प्रकाशित पुस्तके, ८ कथासंग्रह, १० काव्य संग्रह, ३चारोळी संग्रह, ५ लेख संग्रह, २समीक्षा, आणि १४ चरित्रलेख इत्यादी प्रचंड साहित्य संपदा प्रकाशित आहे.
वाचनातून व लेखनातून प्रसिद्ध व्यतिमत्व म्हणजेच प्रा. विजयाताई मारोतकर होत. अशा समृद्ध वारसा लाभलेल्या अध्यक्ष या 12 व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला लाभल्याने संमेलनाची उंची निश्चितच वाढली असल्याचा विश्वास संमेलन समितीने व्यक्त केला आहे.
साहित्यिक व प्रबोधनकार प्रा. विजयाताई मारोतकर संमेलनध्यक्षपदी निवडीने गुरुदेव परिवार तसेच साहित्य क्षेत्रात आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
अकोला येथील राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन म्हणजे वऱ्हाडातील श्रोत्यांना पर्वणीच ! यंदा या १२ व्या संमेलनामध्ये श्रोत्यांचा प्रतिसाद व उत्साह विचार साहित्य संमेलन समितीने विविध विद्यार्थी, युवक, युवती यांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पाचरण करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्रतील नामवंत वक्ते यांना निमत्रित करण्यात येणार आहे, संमेलन यशस्वीतेसाठी अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक संमेलनाचे मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज, हभप. नामदेव गव्हाळे महाराज, गुरुकुंजचे सर्वधिकारी प्रकाश महाराज वाघ इत्यादी जेष्ठ मंडळी यांच्यासह परिश्रम घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे