
* महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया
नागपूर, १४ डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व नेत्यांना एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगाने पुढे नेण्याचे आवाहन केले.
विधानसभेत नियम 293 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर आढावा मांडला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांना सामोरे जात निर्णयक्षम आणि समन्वयातून कारभार केल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड काळ, विविध अडचणीं याचा उल्लेख करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता या सर्व गोष्टी मागे टाकून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करताना सभागृहातील सर्वांनी रचनात्मक कामातून राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना सकारात्मकता आणि विकासकेंद्रित दृष्टिकोन आवश्यक असल्याचे नमूद करत “अब आगे बढ़ चुका हूँ मैं… अब पग नहीं रुकने वाले,” असे म्हणत विकासाच्या मार्गावर राज्याची वाटचाल थांबणार नसल्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई महाराष्ट्रातच राहिल
मुंबईबाबत स्पष्ट भूमिका मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच होती, आहे आणि कायम राहील. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला असून यासंदर्भात कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर, संविधानाच्या चौकटीत महाराष्ट्र चालत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला 21 पानांचा सविस्तर समावेश करण्यात आल्याची माहिती देत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविणार
महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाचा रोडमॅप तयार करताना २०३०, २०३५ आणि २०४७ असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचे उद्दिष्ट असून २०२९-३० दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राची असेल, या दिशेने काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या योजना पुढील पाच वर्षेही चालणार
राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज यांसह सर्व योजना सुरू असून त्या पुढील पाच वर्षेही सुरू राहतील, असे ठामपणे त्यांनी सांगितले.
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील मोठ्या राज्यांचा विचार केल्यास आजही सर्व निकषांवर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पात्र ठरते. राज्याच्या विकासासाठी कर्ज उभारणे आवश्यक असते आणि राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी असताना, केवळ १८.८७ टक्के कर्ज घेतले आहे. राजकोषीय तूटही (Fiscal Deficit) तीन टक्क्यांच्या आत राखण्यात यश आले असून, लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मदत देऊनही हे शक्य झाले. कॅगने घालून दिलेल्या तिन्ही आर्थिक अटी पूर्ण केल्या असून, केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक महाराष्ट्राने केली आहे.
गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर
महाराष्ट्र राज्याने उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती, ऊर्जा, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली असून देशात सर्वांगीण विकासाचा आदर्श उभा केला आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र खूप पुढे गेला असून, केवळ सामंजस्य करार नाही, तर त्यांची अंमलबजावणी होत आहे. दावोसमध्ये झालेल्या १७ लाख ५७ हजार ८०१ कोटी रुपयांच्या करारांपैकी ७५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, २०२४-२५ मध्ये विक्रमी १ लाख ६४ हजार ७७५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. 2025-26 मध्ये आतापर्यंत 91,337 कोटी रुपये एवढी परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे.
विदर्भ व मराठवाड्यात गुंतवणुकीचा ओघ
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विदर्भात इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, स्टील आणि कोल गॅसिफिकेशनमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत आहे, ज्यात टोयोटा, स्कोडा, एथर यांसारख्या मोठ्या ब्रँड्सची गुंतवणूक झाली आहे. मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत असून नवीन 22 कंपन्या सुरू होत आहे. यातून 1 लाख 27 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. अमरावती विमानतळावर एशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था सुरू होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोली जिल्हा ठरणार गुंतवणुकीचा नवीन मॅग्नेट
गडचिरोली जिल्हा हा एक गुंतवणुकीचा नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे. सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येत आहे. अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून दहा ते पंधरा हजार रोजगार होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. त्यातून 65 हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. कोल गॅसिफिकेशनची सर्वात मोठी गुंतवणूक विदर्भात आली असून सोलरमध्येही विदर्भ प्रथम क्रमांकावर राहणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी