
नवी दिल्ली , 14 डिसेंबर (हिं.स.)।संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रामलीला मैदानात झालेल्या काँग्रेसच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन वादग्रस्त घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यावरून आता भाजपाने काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदींविरोधात दिलेल्या वादग्रस्त घोषणांमुळे काँग्रेसचा खरा उद्देश स्पष्ट झाला असून, त्यांना पंतप्रधान मोदींना हटवायचे आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या वादग्रस्त घोषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यामुळे राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. भाजपनेही काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, “आता यांचा अजेंडा स्पष्ट झाला आहे. हा एसआयआरचा मुद्दा नाही, ना संविधानावर हल्ला आहे. एसआयआरच्या नावाखाली हे पंतप्रधान मोदींना हटवू पाहत आहेत का? नुकतेच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धमकी दिली होती. काँग्रेसने आतापर्यंत 150 पेक्षा अधिक वेळा पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली आहे.”
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या मते, “हा आमच्या प्रिय नेत्याचा अपमान आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही. मी स्वतः अद्याप अशी घोषणा ऐकलेली नाही. मात्र, जर खरोखरच अशा घोषणा देण्यात आल्या असतील, तर यावरून काँग्रेसला अजूनही जनतेची इच्छा समजलेली नाही, हे स्पष्ट होते. जेव्हा जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अश्लील भाषा वापरली आहे, तेव्हा जनतेने त्यांना नाकारले आहे.”
दिल्लीतील रामलीला मैदानात आज काँग्रेसची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला लाखो लोक उपस्थित होते. या दरम्यान मतांची चोरी आणि एसआयआर विरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती. देशभरातून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते या रॅलीसाठी दिल्लीत दाखल झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode