
नवी दिल्ली , 14 डिसेंबर (हिं.स.)।रविवारी दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानतळावरील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रविवारी उड्डाण करणाऱ्या सुमारे 85 टक्के फ्लाइट्सना विलंब झाला, तर आगमनाच्या सुमारे एक तृतीयांश उड्डाणांवरही विलंबाचा परिणाम झाला. प्रस्थानाच्या विलंबित उड्डाणांना सरासरी सुमारे अर्धा तास उशीर झाला, तर आगमनाच्या विलंबित उड्डाणांना सरासरी पाच मिनिटांचा विलंब नोंदवण्यात आला.
हवामान विभागाने 14 डिसेंबरच्या सकाळी मध्यम ते दाट धुक्याचा अंदाज वर्तवला होता. याच पार्श्वभूमीवर विमानतळावर ‘लो व्हिजिबिलिटी प्रोसीजर्स’ (कमी दृश्यतेसाठीचे नियम ) लागू करण्यात आले. रविवारी पहाटे रनवेवरील दृश्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. किमान दृश्यता 350 ते 400 मीटरपर्यंत नोंदवली गेली, जी नंतर थोडी सुधारली.
धुक्याचा सर्वाधिक परिणाम सकाळी 5 ते 10 या वेळेत झाला. या कालावधीत कमी दृश्यतेचे नियम पूर्णपणे लागू होते. कॅट-III सुविधा नसलेल्या (नॉन कॅट-III) उड्डाणांना विशेष खबरदारी घ्यावी लागली, तर इंडिगो आणि एअर इंडिया यांसारख्या प्रमुख एअरलाईन्सच्या कॅट-III सुविधायुक्त उड्डाणांनी फारसा अडथळा न येता लँडिंग आणि टेक-ऑफ सुरू ठेवले.
सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सत्रात नॉन कॅट-III उड्डाणे सर्वाधिक प्रभावित झाली. अशा उड्डाणांना साधारण अर्धा तास ते एक तास उशीर झाला. एकदा उड्डाण वेळापत्रक विस्कळीत झाले की त्याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या वेळापत्रकावर होत राहिला. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणतेही मोठे उड्डाण रद्द किंवा वळवण्यात आले नाही आणि कामकाज सर्वसाधारणपणे सुरू होते.
दुपारनंतर दृश्यता 1300 ते 1700 मीटरपर्यंत सुधारल्यामुळे परिस्थिती काहीशी स्थिर झाली, मात्र ही स्थिती फार काळ टिकली नाही. विमानतळ सूत्रांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रेडिक्टिव्ह सिस्टिम आणि रिअल-टाइम डेटाच्या मदतीने कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळले गेले. ‘विंटर फॉग एक्सपेरिमेंट’मधील डेटाचा वापर करून धुक्याचा सुमारे 85 टक्के अचूक अंदाज लावण्यात आला. या उपाययोजनांमुळे या हंगामात धुक्याचा परिणाम किमान ठेवण्यात येत असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील तीनही प्रमुख रनवे (28/10, 29R/11L आणि 29L/11R) आता कॅट-III इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS) ने सुसज्ज आहेत. या प्रणालीमुळे केवळ 50 मीटरपर्यंत दृश्यता असतानाही सुरक्षित लँडिंग शक्य होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode