
अमरावती, 14 डिसेंबर (हिं.स.)
: शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या बटलीचे आदेश शनिवारी (ता. १३) सायंकाळी गृह विभागाने निर्गमित केले. त्यांच्या जागेवर आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची अमरावती शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अचानक झालेल्या बदलीमुळे पोलीस दलात चर्चेला उधान आलेले आहे.अरविंद चावरिया यांनी मेमध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला होता. सात महिने त्यांनी शहरात सेवा दिली. परंतु मनपा निवडणुकीच्या आधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस पोलीस आयुक्त राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी यापूर्वी नागपुर ग्रामीण आणि अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक जबाबदारी सांभाळलेली आहे.पदोन्नतीवर त्यांची मुंबई येथे बदली करण्यात आली होती. मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त पदावर असतांना त्यांची शनिवारी सायंकाळी अमरावती पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. लवकरच ते पदभार सांभाळणार आहेत. तसेच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद आहे.पोलीस उपमहानिरीक्षक अरविंद चावरिया यांची अवघ्या सात महिन्यात उचलबांगडी करण्यामागे नेमके कारण काय, त्यांची कोणती भूमिका अथवा राजकीय नेतृत्वाची कोणती नाराजी त्यांच्या स्थानांतरणाला कारणीभूत ठरली, याविषयी शहरात तर्कवितर्क लावण्याला सुरूवात झालेली आहे.----------------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी