
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असणार आहेत. यानुसार संपूर्ण शहरात ३ हजार ९४६ मतदान केंद्रांची निर्मिती केली जात आहे.
शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा शोध सुरु आहे. गरज पडल्यास पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे.
एका बाजूला मतदार याद्यांवर आलेल्या हरकतींची दखल घेऊन मतदार यादीत सुधारणा करणे, दुबार मतदार शोधून त्यांच्या नावापुढे खून करणे ही कामे सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला मतदान केंद्र निश्चित करण्याचेही काम सुरु आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर प्रशासनाला मतदान केंद्र आणि तेथील मतदार अशी यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे ही दोन्ही कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु