
रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे परिसरात तीव्र चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाटा कंपनीच्या मालकीच्या सुमारे २०० एकर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून, या ठिकाणी मोठा खड्डा खोदून त्यामध्ये पाणी साठवण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या कामासाठी करण्यात येणाऱ्या जोरदार सुरुंग स्फोटांमुळे तापकीरवाडी आणि धनगरवाडा येथील घरांना तडे जाऊ लागले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या स्फोटांमुळे जमिनीत तीव्र कंपन जाणवत असून अनेक घरांच्या भिंती, छत आणि फरशींना मोठे तडे पडले आहेत. काही घरांची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की तेथे राहणे धोकादायक ठरत आहे. परिणामी नागरिकांमध्ये जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत तीव्र भीती निर्माण झाली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी कंपनी व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून योग्य भरपाई देण्यात यावी, तसेच सुरुंग स्फोट तात्काळ थांबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, तापकीरवाडी व धनगरवाडा या दोन्ही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घार यांच्या नेतृत्वाखाली १८ डिसेंबरपासून भिवपुरी येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. टाटा कंपनी व प्रशासनाने तातडीने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके