
रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेतील प्रशिक्षणार्थी व कर्मचारी वर्गासाठी दैनंदिन जेवण, अल्पोपहार तसेच इतर खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी इच्छुक महिला गटांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. संस्थेच्या आवारात स्वच्छ, सकस व परवडणाऱ्या दरात भोजनसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती प्र. प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल वि. द. टिकोले यांनी दिली.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेलच्या आवारात एकूण पाच इमारती असून येथे सुमारे १ हजार ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच संस्थेत सुमारे ९९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांसाठी दैनंदिन जेवण, नाश्ता, चहा, कॉफी व अन्य खाद्यपदार्थांची सुविधा संस्थेच्या आवारातच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सेवेसाठी महिला बचत गट अथवा महिला उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण व अल्पोपहार पुरविण्याचा अनुभव असलेल्या तसेच शासकीय किंवा खासगी उपहारगृह, कॅन्टीन अथवा फिरते उपहारगृह (मोबाईल कॅन्टीन) चालविण्याचा अनुभव असलेल्या महिला गटांनी निविदा सादर कराव्यात.
निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक अटी व शर्ती, निविदा सूचना, विहित निविदा नमुने तसेच महत्त्वाच्या सूचना औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निविदा कागदपत्रांच्या छापील प्रतीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
इच्छुक महिला गटांनी आपली सिलबंद निविदा विहित नमुन्यात दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थेत सादर करावी. सदर करार हा ११ महिन्यांसाठी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धतीने करण्यात येणार असून करारनामा कायदेशीररीत्या तपासलेला असेल. जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरानुसार आकारले जाणार असून वीज व पाणी देयके स्वतंत्रपणे आकारण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके