राज्यासह देशात थंडीचा कहर; आयएमडीकडून अलर्ट जारी
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. अनेक भागांत किमान तापमान 6 ते 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून काही ठिकाणी 5 अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या वेळेत थंड
IMD


मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. अनेक भागांत किमान तापमान 6 ते 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून काही ठिकाणी 5 अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या वेळेत थंडगार वारे वाहत असल्याने गारठा अधिक जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असून तेथून येणाऱ्या शीत लहरींचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे.

मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील काही दिवस हुडहुडी वाढण्याचे संकेत आहेत. परभणी येथे किमान तापमान 6.9 अंश सेल्सिअस, धुळे 6.1 अंश, निफाड 6.3 अंश, जळगाव 7 अंश, तर नाशिक, पुणे आणि मालेगाव येथे 9 अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले. भंडारा आणि गोंदिया येथे तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले आहे. आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम नाशिकच्या निफाड तालुक्यात अधिक जाणवत आहे. सलग सहाव्या दिवशी येथे किमान तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. रुई येथे 5.3 अंश तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असून थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशाच्या इतर भागांतही थंडीचा प्रभाव वाढलेला आहे. तेलंगणा आणि कर्नाटकात 15 व 16 डिसेंबरला काही ठिकाणी शीतलहर कायम राहण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात 15 ते 16 डिसेंबर, उत्तर-पूर्व भारतात 15 ते 19 डिसेंबर, हिमाचल प्रदेशात 15 ते 17 डिसेंबर आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच उत्तर-पूर्व मध्य प्रदेशात सकाळच्या वेळेत दाट धुक्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 14 व 15 डिसेंबरला हलका पाऊस व हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला असून 18 व 19 डिसेंबरलाही अशाच परिस्थितीची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 14 ते 18 डिसेंबरदरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने थंड वारे वाहण्याचा अंदाज आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही येत्या काही दिवसांत थंडी वाढून सकाळच्या वेळेत धुक्याचे प्रमाण वाढणार आहे. उत्तर प्रदेशातील काही भागांत आज सकाळी अतिशय दाट धुके पडल्याने दृश्यता 50 मीटरपेक्षा कमी झाली होती. गेल्या 24 तासांत देशातील मैदानी भागांतील सर्वात थंड ठिकाणे म्हणून पश्चिम मध्य प्रदेशातील राजगढ आणि छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील सात दिवसांत देशातील बहुतांश भागांत किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande