
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। दहावी-बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने कंबर कसली आहे. त्यानुसार यंदा दोन मोठे बदल करण्यात आलेत. यामध्ये परीक्षेसंदर्भातील तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर बदली करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांची वाहतूक डिजिटल लॉक असलेल्या पेटीतून करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपीमुक्तीसाठी राज्य मंडळ खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीची परीक्षा येत्या फेबुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. साधारण दोन्ही मिळून 35 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरवर्षी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात राज्य मंडळाकडून कडक पावले उचलून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते. परंतु तरीदेखील परीक्षेतील गैरप्रकारांना पायबंद घालण्यात राज्य मंडळाला काही प्रमाणात अपयशच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मात्र राज्य मंडळाने थेट मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु