जुन्या आठवणींना उजाळा; माथेरान रेल्वे वारसा महोत्सव संपन्न
रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मध्य रेल्वेच्या वतीने माथेरान स्थानक येथे विशेष वारसा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. माथेरान लाईट रेल्वेच्या शंभर वर्षांहून अधिक कालावधीतील गौरवशाली इतिहास, अभियांत्रिकी कौशल्य आणि
जुन्या आठवणींना उजाळा; माथेरान रेल्वे वारसा महोत्सव उत्साहात


रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मध्य रेल्वेच्या वतीने माथेरान स्थानक येथे विशेष वारसा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. माथेरान लाईट रेल्वेच्या शंभर वर्षांहून अधिक कालावधीतील गौरवशाली इतिहास, अभियांत्रिकी कौशल्य आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाअंतर्गत माथेरान लाईट रेल्वेचा ऐतिहासिक प्रवास उलगडून दाखवण्यात आला. ब्रिटिशकालीन काळापासून सुरू झालेल्या या रेल्वे मार्गाने डोंगरदऱ्यांतून प्रवास करत पर्यटनाच्या दृष्टीने माथेरानला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. या वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात आले.

महोत्सवात रेल्वेशी संबंधित जुनी उपकरणे, दुर्मीळ साधने, ऐतिहासिक छायाचित्रे आणि कलाकृतींचे प्रदर्शन भौतिक तसेच आभासी स्वरूपात सादर करण्यात आले. अभियांत्रिकी पट्टी, पितळेचा वजनकाटा, पाण्याची पातळी मोजण्याची यंत्रणा, जुन्या काळातील सिग्नल कंदील यांसारख्या दुर्मीळ वस्तूंनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या साधनांच्या माध्यमातून त्या काळातील रेल्वे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीची माहिती नागरिकांना मिळाली.

या उपक्रमामुळे माथेरान लाईट रेल्वेचा केवळ वाहतुकीपुरता नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा म्हणून असलेला महत्त्वपूर्ण ठसा अधोरेखित झाला. विशेषतः शालेय विद्यार्थी, तरुण आणि पर्यटकांनी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर भेट देत रेल्वेच्या समृद्ध वारशाची माहिती घेतली.

मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला रेल्वे वारशाची ओळख मिळाली असून पर्यटन, इतिहास जतन आणि संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande