
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्याने आता प्राधिकरणाने रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा म्हणजे स्ट्रक्चर प्लॅन (संरचना आराखडा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे प्राधिकरणामध्ये आता डीपीऐवजी स्ट्रक्चर प्लॅन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे 600 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्राधिकरणाने २०१७ मध्ये विकास आराखड्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर २ ऑगस्ट २०२१ मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर केला.त्यावर सुमारे ६७ हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या. सुनावणीची प्रक्रिया करून बदलासह आराखडा प्रसिद्ध करण्यास पीएमआरडीएने मे २०२४ मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर केला होता; परंतु न्यायालयीन वादामुळे आराखडा मंजुरीचे काम थांबले होते. दरम्यान, मागील सहा महिन्यांपूर्वी हा आराखडा राज्य सरकारने रद्द केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु