
सिंधुदुर्ग, 14 डिसेंबर, (हिं. स.) |आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा संस्थेचे दुसरे प्रेरणा साहित्य संमेलन शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे.
साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग बासष्टाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून होणार असलेल्या दिवसभराच्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान नामवंत साहित्यिक तथा साहित्यिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कल्याण येथील प्रवीण देशमुख भूषविणार आहेत. झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील पुस्तकप्रेमी भालचंद्र जोशी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
संमेलनाची नोंदणी ९.३० वाजता सुरू होईल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. सव्वाअकरा वाजता साहित्यिक संस्थांचे समाजस्वास्थ्यात योगदान या विषयावरील परिसंवाद होईल. त्यात अजित राऊळ (आनंदयात्री, वेंगुर्ले) मंगेश मसके (कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग) आणि प्रा. गजानन मांद्रेकर (साहित्य संगम, मांद्रे, गोवा) सहभागी होतील. दुपारी साडेबारा वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक कै. कुमुद रेगे स्मृती वाचन साधना उपक्रमाचे उद्घाटन प्रसाद रेगे (कुडाळ) करतील.
दुपारी २ वाजता अपर्णा परांजपे प्रभू (देवगड) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. दुपारी सव्वातीन वाजता स्मरण रविशंकराचे (कै. रवींद्र पिंगे व कै. शंकर पाटील) हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये प्रा. नीलम कांबळे, रवींद्र पणशीकर, विनय सौदागर आणि प्रा. मानसी शेट मांद्रेकर सहभागी होतील. सायंकाळी सव्वाचार वाजता शिष्यवृत्ती वर्गाच्या विद्यार्थ्यांचा गौरव होईल. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.
साहित्यप्रेमी या नात्याने या साहित्य संमेलनास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्यवाह सचिन गावडे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम दीक्षित यांनी केले आहे.
अल्पोपाहार, चहापान तथा भोजन व्यवस्था करण्याच्या दृष्टीने उपस्थिती निश्चित करण्यासाठी संमेलनाचे समन्वयक विनय सौदागर (९४०३०८८८०२) यांच्याशी आगाऊ संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी