
बीड, 15 डिसेंबर (हिं.स.)।
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार पुरस्कार वितरण व पत्रकार गुणगौरव सोहळा बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकराव देशमुख मंगल कार्यालयात पार पडला.
या कार्यक्रमास आरोग्यदूत मंगेश चिवटे यांची विशेष उपस्थिती लाभली. पत्रकारांनी समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बजावलेल्या भूमिकेचे मंगेश चिवटे यांनी यावेळी विशेष कौतुक केले. पत्रकारांचे कार्य हे समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्यविषयक बाबींसाठीही शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार अमर हबीब (किसानपत्र आंदोलनाचे प्रणेते), सुहास देशमुख (संपादक – माजलगाव समाचार) आणि गोरख झाटे (आदर्श शेतकरी, देवडी) यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. एम. देशमुख (मुख्य विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे, विशाल परदेशी (न्यूज 18 लोकमत प्रसिद्ध अँकर), मिलिंद अष्टेकर (अध्यक्ष, अ. भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई) उपस्थित होते.
यावेळी विविध जिल्ह्यांतील ज्येष्ठ व युवा पत्रकारांचा पत्रकार गुणगौरव करण्यात आला. पत्रकारांनी समाजहितासाठी केलेल्या निर्भीड व निस्वार्थ कार्याचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला.
या कार्यक्रमास बीड जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis