
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.) अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाच्या अक्षरशः हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या दोन शासकीय इमारतींच्या बांधकामात वाळूऐवजी सर्रास दगडाचा भुसा (डस्ट) वापरला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक (इस्टीमेट) असलेल्या या बांधकामात शासनाने ठरवून दिलेले निकष अक्षरशः पायदळी तुडवले जात असून, कंत्राटदाराचे करोडो रुपये वाचविण्यासाठी दर्जाशी तडजोड केली जात आहे, असा संतप्त सवाल दक्ष नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची माहिती स्थानिक नागरिकांनी कार्यकारी अभियंता नरेंद्र वानखडे यांना वेळोवेळी दिली असतानाही बांधकामात दगडाच्या भुस्याचा वापर थांबलेला नाही. त्यामुळे सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता धृतराष्ट्र बनले आहेत का? असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.
निकृष्ट दर्जाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या अगदी नजीकच कुटीर रुग्णालय आहे. याच रुग्णालय परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य, बहुमजली शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असून सुमारे १० टक्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.प्रत्यक्ष पाहणीदरम्यान इमारतीलगत मोठ्या प्रमाणावर दगडाचा भुसा साठवलेला स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाळूचा एकही कण आढळून आला नाही, ही बाब अधिक धक्कादायक आहे.
प्रत्यक्षात भुसाचाच वापर या संदर्भात पुन्हा विचारणा केली असता, कार्यकारी अभियंता नरेंद्र वानखडे यांनी विभागांतर्गत झालेल्या बैठकीत दगडाचा भुसा वापरू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याच्या पूर्णपणे उलट असून, भुस्याचा वापर थांबण्याऐवजी आणखी वाढल्याचेच चित्र दिसून येत आहे. व्हिडिओ पुरावे; कारवाई शून्य हा गैरप्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करून ते थेट कार्यकारी अभियंता वानखडे यांच्या व्हॉट्सपवर पाठवण्यात आले, तसेच भ्रमणध्वनीद्वारेही सविस्तर माहिती देण्यात आली.मी १० मिनिटांत घटनास्थळी येतो, असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पाहणी, चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. --------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी