
सावित्रीबाई फुले महिला मत्स्य सहकारी संस्थेचा पुढाकारअमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमार्फत निम्न पेढी प्रकल्पातील बेरोजगार तरुणांना वाघोली धरण येथे मत्स्य व्यवसायाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. शासनाच्या जीआरनुसार स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आवश्यक प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसल्यास त्या धरणावर मत्स्य व्यवसाय करता येत नाही. यामुळे भविष्यात स्थानिक धरणग्रस्तांवर अन्याय होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.निम्न पेढी धरणग्रस्त बेरोजगार तरुणांशी संवाद साधताना त्यांनी प्रशिक्षणाअभावी येणाऱ्या अडचणी व भविष्यातील अन्यायाबाबत आपली व्यथा मांडली. ही बाब लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संस्थेने एक पाऊल पुढे टाकत निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.या प्रशिक्षणातून मत्स्य उत्पादन, संवर्धन, व्यवस्थापन व विपणन याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना संस्थेमार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच, निम्न पेढी धरणग्रस्तांना शासनस्तरावरही प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी संस्थेने शासनाकडे अर्ज सादर केला आहे.या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन भविष्यातील संभाव्य अन्याय टळण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी