
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.) स्थानिक नगरपंचायत ला रोजगार हमी योजना लागू नसताना नगर पंचायत रो.ह.योजनेची कर वसुली करीत असून सन २०१४ पासून सदर योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून तात्काळ योजना लागू करून नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना सदर योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी रो.ह.यो. मंत्री भरत गोगावले व राज्याचे आयुक्त यांना निवेदन सादर करून केली. सन २०१४ ला नांदगाव शहराला नगरपंचायत चा दर्जा मिळाला असून नगरपंचायत अस्तित्वात येऊन १० वर्षाचा कालावधी होत असून स्थानिक शहरातील नागरिकांना शेतकऱ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत चा लाभ मिळाला नाही १० वर्षात शेकडो शेतकरी धडक सिंचन विहीर योजना गोठा शेड वृक्ष नर्सरी इत्यादी योजनेपासून वंचित आहे. रो.ह. यो अंतर्गत कुठल्याच योजना लागू नसल्याने मजुरांचे जॉब कार्ड सुद्धा मिळत नसल्याने मजुरांना रो.ह. योजनेच्या कामावर काम करता येत नाही. वास्तविक शासनाने १६ एप्रिल २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून क वर्ग नगरपरिषद नगरपंचायती क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजना राबविण्याचा आदेश सुद्धा काढला आहे मात्र सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने न.पं. क्षेत्रातील मजुरांना कुशल, अकुशलची कामे सुद्धा मिळत नाही.तसेच सन २०२५ मध्ये अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींना बांधकाम करण्यासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारने कबूल करून रो.ह.यो.अंतर्गत सदरचे अनुदान देण्याचे शासन परिपत्रक सुद्धा काढण्यात आले असतांना अद्याप अनुदानाचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे नांदगाव नगरपंचायत क्षेत्रात रो.ह.यो. लागू करावी व खचलेल्या विहिरींचे अनुदान देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रो.ह.यो.मंत्री भरत गोगावले व रो.ह.यो. आयुक्त यांना सादर केले.नांदगाव नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमी योजना लागू नसतांना सदर योजनेचा कुठलाच लाभ स्थानिक नागरिकांना मिळत नसतांना नगरपंचायत रो.ह.योजनेची कर वसूल करू शकत नाही तरी सुद्धा न.पं.कर वसुली करीत आहे असे मत प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी