
नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढून त्यांना समृद्धीच्या मार्गावर देण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरीपुत्र आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजाच्या वेळी आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. मराठवाड्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. खरिपाची संपूर्ण पीक पाण्याखाली गेली आहे. तर अनेक भागात लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेले आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले.त्याबद्दल आपण राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर अभिनंदन करतो. परंतु एवढ्यावर शेतकरी सुखी होणार नाही. त्यांच्या डोक्यावरचे कर्ज जाणार नाही. त्यासाठी राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिवस दाखवायचे असतील तर तातडीने कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis