पंतप्रधान मोदी जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान देशांच्या दौऱ्यासाठी रवाना
नवी दिल्ली , 15 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते जॉर्डन, इथियोपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानुसार, हा दौरा भारताचे पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील देश
पंतप्रधान मोदी जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान देशांच्या दौऱ्यासाठी रवाना


नवी दिल्ली , 15 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते जॉर्डन, इथियोपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानुसार, हा दौरा भारताचे पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या दौऱ्यात व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक सहकार्य आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा जॉर्डन आणि इथियोपियाचा हा पहिला संपूर्ण द्विपक्षीय दौरा असेल, तर ओमानला ते दुसऱ्यांदा भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदी १५ डिसेंबर रोजी जॉर्डनची राजधानी अम्मान येथे पोहोचतील. तेथे ते राजा अब्दुल्ला दुसरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करतील. त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवरील बैठक होईल. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि राजकीय सहकार्यावर या भेटीत भर दिला जाणार आहे.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि राजा अब्दुल्ला भारत–जॉर्डन व्यापार कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमात दोन्ही देशांतील प्रमुख उद्योजक सहभागी होतील. याशिवाय पंतप्रधान मोदी जॉर्डनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. युवराजांसोबत ते पेट्रा या ऐतिहासिक शहराला भेट देतील, जे भारतासोबतच्या प्राचीन व्यापारी संबंधांचे प्रतीक मानले जाते.

जॉर्डननंतर पंतप्रधान मोदी १६ ते १७ डिसेंबरदरम्यान इथियोपियाच्या राजकीय दौऱ्यावर असतील. ही त्यांची पहिली इथियोपिया भेट असेल. तेथे ते पंतप्रधान अबी अहमद अली यांची भेट घेतील. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा होईल. पंतप्रधान मोदी इथियोपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनालाही संबोधित करतील. या दौऱ्यात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. आफ्रिकेत दीर्घकालीन आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. ‘एजेंडा २०६३’ अंतर्गत आफ्रिकेच्या प्राधान्यक्रमांवर आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. भारतीय समुदायाशी संवाद हा देखील या दौऱ्याचा महत्त्वाचा भाग असेल.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी १७ ते १८ डिसेंबरदरम्यान ओमानला भेट देतील. ही त्यांची ओमानची दुसरी भेट असेल. भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या दौऱ्यात भारत–ओमान व्यापक आर्थिक भागीदारी करारावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. हा करार दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande