
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)| चंद्रपूरहून चिखलदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या महिलांच्या वाहनाला झालेल्या अपघातात ३५ वर्षीय तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी मडकी गावाजवळ घडली. महिला प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाच काळाने चालकावर झडप घातली.
सुमित बनकर (वय ३५, रा. चंद्रपूर) असे मृत चालकाचे नाव आहे. सुमित बनकर हे ६ सीटर ट्रॅव्हलर घेऊन चंद्रपूरहून चिखलदरा येथे आले होते. त्यांच्या वाहनात चंद्रपूर येथील २२ महिला आणि एक मुलगी असा पर्यटकांचा गट होता. शनिवारी पर्यटन करून त्यांनी चिखलदऱ्यात मुक्काम केला होता.
रविवारी सकाळी काही पर्यटनस्थळांची पाहणी केल्यानंतर दुपारी दीड ते दोनच्या सुमारास सर्व पर्यटक चंद्रपूरकडे परतण्यासाठी निघाले. सुमारे अर्ध्या तासानंतर मडकी गावाजवळील आड नदीच्या वळणावर पोहोचताच एका महिला प्रवाशाला उलटी झाल्याने सुमित यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यावेळी चालकासह काही महिला खाली उतरल्या, तर काही महिला वाहनातच बसून होत्या.
दरम्यान, उतारावर उभे असलेले वाहन अचानक आपोआप पुढे सरकू लागले आणि दरीच्या दिशेने जाऊ लागले. मोठा अनर्थ टाळण्यासाठी सुमित यांनी धाव घेऊन वाहन अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वाहनाचे वजन आणि उतारामुळे ते थांबवणे शक्य झाले नाही. वाहन झाडांवर आदळत पुढे सरसावले आणि या धडकेत सुमित बनकर यांचा जागीच मृत्यू झाला. अखेर वाहन समोरच्या झाडावर आदळून थांबले.घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, महिलांना मदत करताना चालकाचा जीव गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य केले. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी