
गडचिरोली, 17 डिसेंबर (हिं.स.) | दुबईत झालेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची दिव्यांग धनुर्धर श्वेता मंजू भास्कर कोवे हिने सुवर्णपदक पटकावले. ती आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्वेताने उत्कृष्ट सादरीकरण करत वैयक्तिक प्रकारात सुवर्ण, तर मिश्र प्रकारात कास्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत श्वेताने भारतासह गोंडवाना विद्यापीठाचे आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्वेताने हे यश संपादन केले. ग्रामीण व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून सुवर्णपदकापर्यंत मजल मारणे हे जिल्हावासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीय, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ प्रशासनाचे मोलाचे सहकार्य तिला लाभले आहे.
तिला प्रशिक्षक डॉ.श्याम कोरडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण , क्रीडा संचालक डॉ.अनिता लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले आणि विद्यापीठ परिवाराच्या वतीने तिचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.
भविष्यातही श्वेता कोवे हिच्याकडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर अशाच प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond