
दुबई, 17 डिसेंबर, (हिं.स.)वरुण चक्रवर्तीने इतिहास रचला आहे. ८१८ पॉईंटसह ३४ वर्षीय वरुण आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. वरुणने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत आधीच अव्वल स्थान पटकावले होते. पण नवीनतम क्रमवारीमुळे त्याला आणखी फायदा झाला आहे, ज्यामुळे तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
वरुण चक्रवर्ती सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत व्यस्त आहे. तो भारतीय संघासाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात, वरुण चक्रवर्तीने १९ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, त्याने न्यू चंदीगडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २९ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे खेळवण्यात आला. येथेही तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, त्याने ११ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युवा भारतीय फलंदाज तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याला या सामन्यात आपल्या संघाला विजय साकारुन देता आला नव्हता. पण तिलकची फलंदाजी यशस्वी झाली आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. यामुळे त्याला आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने सुधारणा केली आहे. तिलक सहाव्या क्रमांकावर होता. तो दोन स्थानांनी झेप घेऊन आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तिलक वर्माने पाकिस्तानचा साहिबजादा फरहान आणि इंग्लंडचा जोश बटलर यांना मागे टाकले आहे. पण तिलकचे हे सर्वोत्तम रँकिंग नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, तो टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. भारताचा अभिषेक शर्मा क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा फिल साल्ट दुसऱ्या आणि श्रीलंकेचा पथुम निस्सांका तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताचा सूर्यकुमार यादव दहाव्या क्रमांकावर आहे.
टी-२० संघ क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. भारत हा टी-२० विश्वविजेता देखील आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे. आणि भारत या स्पर्धेत विजयासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून प्रवेश करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे