मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई इथे उघडणार
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस(टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे उघडणार असून त्याचे उदघाटन 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि य
Indian Postal Department


मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस(टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे उघडणार असून त्याचे उदघाटन 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे.

हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारतीय टपाल सेवेच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनाशी अनुरूप असलेले हे जेन झी टपाल कार्यालय विशेषतः तरुण नागरिक, विद्यार्थी आणि डिजिटल युगातील लोकांसाठी तयार केलेल्या टपाल सेवांसाठी एक नवीन आणि समकालीन दृष्टिकोन सादर करते. दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या टपाल कार्यालयांच्या यशस्वी प्रारंभानंतर, मुंबईतील हा शुभारंभ या नवोन्मेषी उपक्रमाचा देशभरात विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह आणि भारतीय टपाल सेवेच्या (मुंबई विभाग) टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते, आयआयटी मुंबईच्या कुलसचिवांच्या सन्माननीय उपस्थितीत, तसेच भारतीय टपाल सेवेचे अधिकारी व कर्मचारी आणि आयआयटी मुंबईतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होईल.

एक आकर्षक, आधुनिक आणि युवा-केंद्रित स्वरूप देऊन रचना केलेले हे 'जेन झी पोस्ट ऑफिस' सार्वजनिक सेवा वितरणातील एका परिवर्तनकारी प्रगतीचे प्रतीक आहे. या जागेची रचना, भित्तिचित्रे आणि भिंतींवरील डिझाइन भारतीय टपाल सेवेच्या चमूने आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधून संकल्पित आणि विकसित केले असून यात सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.

जेन झी टपाल कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये :

मोफत वाय-फाय सुविधा असलेली जागा; कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था आणि एक छोटे वाचनालय; समर्पित संगीत कक्ष; निवडक टपाल तिकीट संग्रह संबंधित पूरक वस्तू; पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'पार्सल ज्ञान पोस्ट'; पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण; आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा; टपाल कार्यालय बचत बँक (पीओएसबी ) योजनेचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन

विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती:

स्पीड पोस्ट सेवांवर 10% सवलत; मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी 5% सवलत

टपाल कार्यालयाची एक गतिशील समुदाय केंद्र म्हणून ओळख निर्माण करून, परंपरा आणि नाविन्य यांचा मेळ घालणे, हा भारतीय टपाल सेवेचा उद्देश आहे, जेणेकरून टपाल सेवा पुढील पिढीसाठी कालानुरूप, आकर्षक आणि सुलभ राहतील.

आयआयटी मुंबई येथील 'जेन झी पोस्ट ऑफिस' हे भारतीय टपाल सेवेच्या नवोन्मेष, युवा सहभाग आणि नागरिक केंद्रित सेवा वितरणाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. टपाल कार्यालय केवळ व्यवहाराचे ठिकाण म्हणून मर्यादित न राहता समृद्ध अनुभव देणारे केंद्र ठरावे, यासाठी भारतीय टपाल सेवा निरंतर कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande