
नवी दिल्ली , 17 डिसेंबर (हिं.स.)। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, 17 डिसेंबर रोजी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अतिरिक्त सामान (एक्स्ट्रा लगेज) नेणाऱ्या प्रवाशांना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत खासदार वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी यांनी ट्रेनमध्ये अतिरिक्त सामान नेण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स्ट्रा लगेजवर शुल्क आकारण्याची तरतूद असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की सध्या प्रत्येक डब्यात प्रवासी स्वतःसोबत नेऊ शकणाऱ्या सामानाची वर्गनिहाय कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती त्यांनी लेखी स्वरूपात सभागृहात सादर केली.
संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, सेकंड क्लासमध्ये प्रवास करणारा प्रवासी विनाशुल्क जास्तीत जास्त 35 किलो वजनाचे सामान नेऊ शकतो. मात्र, यापेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन जायचे असल्यास प्रवासी 70 किलोपर्यंत सामान नेऊ शकतो, पण त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
स्लीपर क्लासमधील प्रवाशांना 40 किलोपर्यंत सामान विनाशुल्क नेण्याची मुभा आहे. या वर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमाल 80 किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. तर एसी 3-टायर किंवा चेअर कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त 40 किलो वजनाचे सामानच नेण्याची परवानगी आहे आणि त्यांची मर्यादा याच वजनापुरती राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode