
नवी दिल्ली, 17 डिसेंबर (हिं.स.)।इथिओपियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान – ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ प्रदान केला आहे. हा सन्मान देताना इथिओपियाने आपली जुनी परंपरा मोडली आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत, ज्यांना इथिओपियाने आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले आहे. आतापर्यंत जगातील 25 देशांनी पंतप्रधान मोदी यांना आपापल्या देशांचा सर्वोच्च सन्मान दिला असून, मोदींपूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांना इतके उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले नव्हते.
हा सन्मान अदीस आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात आयोजित विशेष समारंभात पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत जारी केलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, भारत–इथिओपिया भागीदारी मजबूत करण्यात दिलेल्या त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल तसेच जागतिक राजनेते म्हणून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जॉर्डन दौरा पूर्ण करून इथिओपियात दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान अबी अहमद अली यांना आपला भाऊ आणि मित्र असल्याचे संबोधले.
इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सर्वांच्या सान्निध्यात, इथिओपियाच्या या महान भूमीवर उपस्थित राहणे हे माझ्यासाठी अत्यंत सौभाग्याचे आहे. आज दुपारी मी इथिओपियात पोहोचलो. येथे पोहोचताच येथील जनतेने मला विलक्षण आपुलकी आणि आत्मीयतेचा अनुभव दिला. पंतप्रधान अली स्वतः मला विमानतळावर स्वागतासाठी आले होते. त्यांनी मला फ्रेंडशिप पार्क आणि विज्ञान संग्रहालयात नेले. तेथे नेतृत्वाशी विविध महत्त्वाच्या विषयांवर माझी सखोल चर्चा झाली.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode