
नवी दिल्ली , 17 डिसेंबर (हिं.स.)।परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा दौरा एक महत्त्वाचे कूटनीतिक पाऊल मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान बुधवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. जयशंकर यांनी सांगितले की भारत–इस्रायल रणनीतिक भागीदारी भविष्यात आणखी मजबूत होईल. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छाही नेतन्याहूंना दिल्याचे नमूद केले.
जयशंकर आणि नेतन्याहू यांच्यात तंत्रज्ञान, आर्थिक क्षेत्र, कौशल्य व प्रतिभा विकास, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नेतन्याहू यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत, दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे म्हटले.
याआधी मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जेरुसलेममध्ये इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री निर बरकात यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांतील गुंतवणूक, नवोपक्रम आणि व्यापारी सहकार्य पुढे नेण्यावर चर्चा झाली. जयशंकर यांनी विश्वास व्यक्त केला की भारत–इस्रायल मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकरच पूर्ण होईल, ज्यामुळे आर्थिक भागीदारीला नवी गती मिळेल.
यावेळी जयशंकर यांनी सिडनीतील बॉंडी बीच येथे हनुक्का उत्सवाच्या वेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेची (झिरो टॉलरन्स) भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी इस्रायलचे आभार मानले आणि दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाविरोधात दोन्ही देश एकत्र उभे असल्याचे सांगितले.
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की गेल्या दशकात भारत–इस्रायल रणनीतिक भागीदारी लक्षणीयरीत्या मजबूत झाली आहे. यात सरकार-ते-सरकार, व्यवसाय-ते-व्यवसाय आणि लोक-ते-लोक यांच्यातील संबंधांचा समावेश आहे. जयशंकर यांनी गाझा शांतता योजनेला भारताचा पाठिंबा पुनःएकदा अधोरेखित केला आणि या योजनेमुळे प्रदेशात शाश्वत आणि दीर्घकालीन शांततेचा मार्ग खुलेल, अशी आशा व्यक्त केली.
दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर असताना जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन साअर, राष्ट्राध्यक्ष इसहाक हरझोग आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली होती, त्यानंतर इस्रायली पंतप्रधानांनी लवकरच प्रत्यक्ष भेटीचे संकेत दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode