
दुबई, 17 डिसेंबर (हिं.स.)भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत नंबर १ स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला मागे टाकत ती जगातील सर्वोत्तम क्रमांकाची फलंदाज बनली आहे. या आठवड्यात स्मृती मानधनाचे रेटिंग गुण ८११ वर राहिले, तर वोल्वार्डचे रेटिंग ८१४ वरून ८०६ वर घसरले. यामुळे मानधना एकदिवसीय क्रमवारीत नंबर १ फलंदाज बनली आहे. पहिल्या दोन स्थानांव्यतिरिक्त टॉप १० रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
स्मृती मानधना आणि लॉरा वोल्वार्ड अनुक्रमे १ आणि २ क्रमांकावर, अॅशले गार्डनर आणि नॅट सायव्हर-ब्रंट अनुक्रमे ३ आणि ४ क्रमांकावर आहेत. बेथ मुनी पाचव्या क्रमांकावर आहे, तर एलिसा हीली सहाव्या क्रमांकावर आहे. सोफी डेव्हाईन आणि एलिस पेरी संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर आहेत, तर हेली मॅथ्यूज नवव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, जेमिमा रॉड्रिग्ज दहाव्या क्रमांकावर आहे आणि महिला एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या टॉप-१० यादीत ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे.
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडमधील अनेक क्रिकेटपटूंनीही आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पूर्व लंडनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 7 विकेट्सने जिंकला. आयर्लंडच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने फक्त ३७ षटकांत विजय मिळवला. सून लुस आणि मियाने स्मित यांनी अर्धशतके झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सुन लुसच्या प्रभावी कामगिरीमुळे, तिने एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेतली आहे आणि ती ३१ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड या सामन्यात फक्त ३१ धावा करू शकली, ज्यामुळे तिच्या क्रमवारीवर परिणाम झाला आणि ती पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे