
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) : आनंदवाडी परिसरातील कॅनॉलमध्ये २१ वर्षीय तरुण वडिलांच्या डोळ्यादेखत वाहून गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. ओम अरविंद सहारे (रा. अमरावती) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा कॅनॉलजवळ पाय धुण्यासाठी गेला असताना अचानक पाय घसरून तो प्रवाहात पडला. पाण्याचा वेग अधिक असल्याने काही क्षणातच तो कॅनॉलच्या प्रवाहात वाहून गेला. ही संपूर्ण घटना वडिलांच्या समोरच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ तिवसा तहसीलदार, तिवसा पोलीस ठाणे, अप्पर वर्धा प्रशासन तसेच रेस्क्यू टीम यांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली असून शोधकार्य लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कॅनॉल परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी