
चंद्रपूर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच चंद्रपूर शहरात १६ ऑक्टोबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या निर्देशानुसार शहरातील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज व इतर बाबी काढून घेण्याची मोहीम मनपा प्रशासनामार्फत राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ७२ तासात शहरातील एकूण २३७ पोस्टर्स, १७३ बॅनर्स मनपा प्रशासनाने हटविले आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सरकारी मालमत्तेवरून २४ तासाच्या आत, सार्वजनिक ठिकाणांवरून ४८ तासांच्या आत तर खाजगी मालमत्तेवरून ७२ तासांच्या आत सर्व शासकीय कार्यालयातील, परिसरातील तसेच खाजगी जागेतील सर्व राजकीय पक्षाचे, नेत्यांचे, सदस्यांचे फोटो, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग्ज, कटआऊट, झेंडे, भित्तीपत्रके, प्रसिध्दी पत्रके, प्रचार पत्रके काढण्यात येतात. याअंतर्गत प्रशासनाने व इतर बाबी काढल्या आहेत. याबाबतचा परिपूर्ण अहवाल मनपा प्रशासनाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
याअंतर्गत मनपा प्रशासनाने सरकारी मालमत्तेवरून २४ तासांच्या आत ७१ भिंतीपत्रके, ७३ पोस्टर्स, १४७ बॅनर्स, झेंडे - कटआऊट व इतर मिळुन ४८८ बाबी काढल्या. सार्वजनिक ठिकाणांवरून ४८ तासांच्या आत ११७ भिंतीपत्रके, ३६ पोस्टर्स, १८ बॅनर्स, कटआऊट - झेंडे व इतर ५०९ बाबी तसेच खाजगी मालमत्तेवरून ७२ तासांच्या आत १६ भिंतीपत्रके,१२८ पोस्टर्स, ८ बॅनर्स, कटआऊट- झेंडे व इतर बाबी मिळुन २९४ गोष्टी काढल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव