
लातूर, 18 डिसेंबर, (हिं.स.)। शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. यामध्ये भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन उशीरा झाले आहे व ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे महाआयटी पोर्टलवर स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरता आला नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाआयटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची रक्कम आधार सलंग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यासाठी बँक डिटेल्स भरण्याचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्वरीत महाआयटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने बँक डिटेल्स भरुन बँक पासबुक अपलोड करुन घ्यावे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis