
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)।
, : राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग आणि जिल्हा नियोजन विभागातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश काळे, शिक्षणिाधकारी प्रशांत दिग्रसकर (माध्यमिक), सरोज जगताप (प्राथमिक), महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील भालेराव आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले की, अल्पसंख्याक दिवस हा दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करण्याविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविला जातो. एवढेच नव्हे, तर देशातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या पद्धती आणि पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, अल्पसंख्याक लोकांना पुढे आणणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा उद्देश आहे. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेत अल्पसंख्याक बांधवांनी प्रगती साधावी.
सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आव्हाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, सकारात्मक कृती आणि सर्वसमावेशक विकासाद्वारे अल्पसंख्याक समुदायांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारणा करून एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सक्रियपणे सहभागी होण्याची समान संधी मिळावी, या समुदायांना शिक्षण, रोजगार, आर्थिक व्यवहारांमध्ये समान वाटा देणे आणि त्यांची उन्नती करणे हा दिवस साजरा करण्याचा हेतू असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV