
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।
गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटकातून हापूस आंब्याची पहिली आवक झाली आहे. दरवर्षी कोकणातून पहिली आवक होत असते. रोहन सतीश उरसळ यांच्या गाळ्यावर कर्नाटक येथील शेतकरी जी. एम. शफीउल्ला यांच्या शेतातून सहा पेट्यांची आवक झाली. चार डझनाच्या पेटीला लिलावात ५ हजार १०० रुपये भाव मिळाला. सुरेश केवलाणी आणि बोनी रोहरा यांनी या पेटीची खरेदी केली. त्यावेळी सतीश उरसळ, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्यासह अन्य आडतदार उपस्थित होते. कर्नाटक येथून लालबाग आंब्याची आवक झाली होती.त्यानंतर आता हापूसचीही आवक सुरू झाली आहे. नेहमीच्या तुलनेत २० ते २५ दिवस आधीच ही आवक झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक भाव मिळाला आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी कर्नाटक येथील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आवक कमी झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु