
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।
देशात यंदा साखर उत्पादन वाढण्याची शक्यता लक्षात घेता साखरेच्या किमान विक्री दर स्थिर राहण्यासाठी केंद्राने साखर निर्यातीच्या कोट्यात आणखी वाढ करावी. त्याचबरोबर आणखी पाच लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
यंदाच्या साखर हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ३५ लाख टन साखर वळविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगासाठी निश्चित केलेल्या इथेनॉल कोट्यात आणखी वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले आहे.
सध्याचे साखर उत्पादन लक्षात घेता, आणखी पाच लाख टन साखर इथेनॉलकडे वळविल्यास साखर उद्योगाकडून इथेनॉलचा अतिरिक्त कोटा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे इथेनॉल निर्मितीतील साखर उद्योगाचा सध्याचा टक्का वाढेल. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांकडे केंद्र सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु