पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील निसर्गदत्त वारसा असलेल्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने पाऊल उचलले आहे. ''देवराई संरक्षण व संवर्धन योजने''अंतर्गत आंबेगाव, जुन्नर
पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।

पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील निसर्गदत्त वारसा असलेल्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने पाऊल उचलले आहे. 'देवराई संरक्षण व संवर्धन योजने'अंतर्गत आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील पाच गावांसाठी प्रत्येकी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे जैवविविधतेच्या जतनाला मोठी चालना मिळणार आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत खेड तालुक्यातील खरपूड, आंबेगाव तालुक्यातील आहूपे, तिरपाड, राजपूर आणि जुन्नर तालुक्यातील अंजनावळे या गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सांगितले. या संदर्भात अंमलबजावणीसाठी देसाई यांनी आदेश दिले आहेत.देवराईचे पावित्र्य आणि नैसर्गिक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने काही कडक अटी घातल्या आहेत. देवराईतील प्राचीन झाडे तोडण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, मेलेल्या झाडांपासूनही जैवविविधता निर्माण होत असल्याने ती काढण्यापूर्वी गावातील समितीचा सल्ला घेणे बंधनकारक आहे. तसेच, संपूर्ण परिसर 'प्लास्टिक मुक्त' ठेवणे आणि शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande