विजय केंकरे दिग्दर्शित सुभेदार गेस्ट हाऊस २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। मराठी नाट्यसृष्टीला तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु अ
मुंबई


मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)।

मराठी नाट्यसृष्टीला तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण, कोथरूड तर मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबरला शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.

“सुभेदार गेस्ट हाऊस” या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. अभिनेता सौरभ गोखले, शंतनू मोघे, आनंद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख, आनंद पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिका या नाटकात पहायला मिळणार आहेत.

नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

तर सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरे व राजेंद्र पै काम पाहत आहे.

धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा एकदा रंगभूमीवर सक्रिय होत असल्याची बातमी समजताच नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. आशयघन कथा, कसदार दिग्दर्शन आणि अनुभवी तांत्रिक टीम यांच्या जोरावर “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande