
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबईतील एनसीपीए आणि सीएसआर पार्टनर सिटी यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील खल्वायन संस्थेतर्फे जानेवारीमध्ये संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत १९६९ साली स्थापन झालेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) या दक्षिण आशियातील पहिल्या बहुशैली सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात गेली २८ वर्षे सातत्याने संगीत आणि नाट्यक्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या खल्वायन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहर आणि परिसरातील संगीत नाट्यरसिकांचे संगीत नाटकांवरील प्रेम आणि आवड लक्षात घेऊन संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी करण्यात आले आहे. येत्या २ ते ४ जानेवारी २०२६ या काळात हा नाट्यमहोत्सव रंगणार आहे. एनसीपीए ही संस्था संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य आणि फोटोग्राफी या क्षेत्रातील भारताच्या समृद्ध आणि दोलायमान कलात्मक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच विविध शैलीतील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांद्वारे आणि नावीन्यपूर्ण कार्य सादर करण्यासाठी वचनबद्ध आहे. जेआरडी टाटा आणि प्रसिद्ध अणुभौतिक शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे बंधू डॉ. जमशेद भाभा या दोन महान द्रष्ट्यांनी दूरदृष्टीने आणि काळाची गरज ओळखून या संस्थेची स्थापना केली. दरवर्षे ७०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन ही संस्था करते.
रत्नागिरीतील खल्वायन संस्थेची स्थापना ऑक्टोबर १९९७ मधे विजयादशमीच्या मुहूर्तावर झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताची व संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी गेली २८ वर्षे मासिक संगीत सभा, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा विशेष संगीत सभा, संगीत मार्गदर्शन शिबिरे तसेच १७ जुन्या व नव्या गद्य व संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून संस्थेने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे योगदान केले आहे.
या दोन संस्थांतर्फे खल्वायन संस्थेने निर्मिती केलेली ३ संगीत नाटके रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात तिन्ही दिवशी सायंकाळी ७ वाजता नाट्यमहोत्सवात सादर केली जाणार आहेत. शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या दिवशी ५३ व्या राज्य नाट्य महोत्सवात ६ वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'संगीत संशयकल्लोळ' नाटकाचे सादरीकरण होणार आहे. नवरा-बायकोच्या संशयी आचरटपणावर बेतलेले हे धमाल विनोदी नाटक आहे. १९१६ साली पहिला प्रयोग पुण्यात झालेले हे नाटक १०० वर्षे उलटूनही रसिकांना पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. मराठीतील विनोदप्रधान नाटकांमधील एक अग्रणी नाटक, देखणे नेपथ्य, बहारदार गायकी, कर हा करी, मृगनयना रसिकमोहिनी, नाट्यगान निपुण, मजवरी तयांचे प्रेम खरे यांसारख्या सुमधुर नाट्यपदांनी हे नाटक नटले आहे.
दि. ३ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरीचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि ४२ व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक आणि नवी दिल्लीत द्वितीय क्रमांकप्राप्त 'संगीत शांतिब्रह्म' हे नाटक सादर होणार आहे. संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित या नाट्यकृतीमध्ये उत्तम देखणे नेपथ्य, आशयघन कथानक, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या भारूड, अभंग, गवळण, इत्यादी गानप्रकारातील कर्णमधुर नाट्यपदे आहेत.
दि. ४ जानेवारी रोजी प्रा. प्र. के.अत्रे यांचे सुप्रसिद्ध संगीत नाटक 'संगीत प्रीतिसंगम' नाटक सादर होणार आहे. संत सखूच्या जीवनावर आधारित ट्रीकसीनने नटलेले बहारदार नाटक. खल्वायनच्या ज्येष्ठ कलावंतांचा कसदार अभिनय, नवीन तरुण तडफदार कलावंतांच्या गायकीतून सादर होणारी तू सुंदर चाफेकळी, आज आपुल्या प्रथम प्रीतीचा, कृष्ण माझी माता, देह देवाचे मंदिर, किती पांडुरंगा वाहू यांसारख्या सुमधुर पदांनी हे नाटक नटलेले आहे.
तिन्ही संगीत नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले असून रत्नागिरी, चिपळूण, देवगड भागातील तरुण कलावंत भूमिका करणार आहेत. तिन्ही नाटकांच्या सीझन तिकीटिचे दर रु. ५००/-, रु. ४००/- रु. ३००/- असे असून येत्या २८ डिसेंबरपासून दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सीझन तिकिटांची आगाऊ विक्री सुरू होणार आहे. दैनंदिन तिकीट दर रु. ३००/- रु. २५०/- रु. २००/- असे असून त्याची विक्री नाट्यगृहावर प्रयोगाच्या दिवशी सुरू असेल.
संगीत नाट्यरसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर आणि खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी