
वॉशिंग्टन , 19 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ग्रीन कार्ड लॉटरी कार्यक्रम (डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्राम) स्थगित केली आहे. हाच तो कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून ब्राउन विद्यापीठ आणि एमआयटी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपी अमेरिकेत दाखल झाला होता.
अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार त्यांनी अमेरिकन नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा यांना हा कार्यक्रम तात्पुरता थांबवण्याचे आदेश दिले आहेत. क्रिस्टी नोएम म्हणाल्या “हा धोकादायक व्यक्ती आमच्या देशात कधीच प्रवेश करू नये होता.” या निर्णयाला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ग्रीन कार्ड लॉटरीसारख्या कार्यक्रमांद्वारे अमेरिकेत येणाऱ्या व्यक्तींची सखोल पार्श्वभूमी तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या मते, सध्याच्या प्रणालीत काही त्रुटी असून त्यांचा गैरवापर होऊ शकतो.
ग्रीन कार्ड लॉटरी, ज्याला अधिकृतपणे डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्राम म्हटले जाते, दरवर्षी हजारो लोकांना अमेरिकेत कायमस्वरूपी निवासाची संधी देते. या कार्यक्रमाचा उद्देश अशा देशांतील नागरिकांना संधी देणे हा आहे, जिथून अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या तुलनेने कमी आहे.
डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्रामअंतर्गत दरवर्षी लॉटरी पद्धतीने सुमारे 50 हजार ग्रीन कार्ड्स अशा देशांतील नागरिकांना दिली जातात, ज्यांची अमेरिकेत लोकसंख्या कमी आहे. यामध्ये आफ्रिकेतील अनेक देशांचा समावेश आहे.2025 सालच्या व्हिसा लॉटरीसाठी सुमारे 2 कोटी लोकांनी अर्ज केला होता. यापैकी विजेते आणि त्यांच्या जीवनसाथींसह 1 लाख 31 हजारांहून अधिक लोकांची निवड करण्यात आली होती. निवडीनंतर सर्व अर्जदारांची सखोल सुरक्षा तपासणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांना अमेरिकेत प्रवेशाची परवानगी दिली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode